मोबाइल सोसायटी रिसर्च इन्स्टिट्युट चा संशोधन अहवाल आणि एक कहानी

Posted by at
सायंकाळची वेळ. बगीचा लहान मुलांनी फुललेला. काही घसरगुंडीवरून घसरताहेत, काही झुला झुलताहेत तर काही इतर खेळण्यांचा मनमुराद आनंद घेताहेत. काही नुसतीच पळापळी करताहेत. एकुणात सर्वत्र किलबिलाट. छान वाटतं अशी बागडणारी मुलं पाहून. दिवसभर वेगवेगळ्या ताणतणावाचा सामना केल्यानंतर काही क्षण बगिच्यात घालवले की ही खेळणारी, बागडणारी मुलं पाहून मन प्रसन्न होऊन जातं. मनावरची मळभ दूर सारली जाते. नवा उत्साह संचारतो. पण त्या दिवशीचा अनुभव खूपच वेगळा होता. वॉकिंग ट्रॅकवर चार-पाच फेऱ्या मारल्यानंतर एका बेंचवर येऊन बसले होते. सहज बाजूच्या बेंचवर नजर गेली. सात-आठ वर्षांचा एक मुलगा बसलेला होता. डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, उंची कपडे आणि हातात महागडा मोबाइल. मोबाइल स्क्रीनवर त्याची बोटं वेगानं फिरत होती. गेम खेळत होता कसला तरी. अगदी तल्लीन होऊन. पंधरा मिनिटे, अर्धा तास, एक तास. बापरे!

आजूबाजूला त्यांच्याच वयाची मुलं वेगवेगळ्या खेळ प्रकारात दंग होती. हा मुलगा मात्र मोबाइलच्या खेळात दंगलेला. अर्ध्या तासानंतर एक महिला त्याच्याजवळ आली. आई ती त्याची. तिनं त्याच्या डोक्यावर हात फिरवला. ‘हं, गुड. आणखी अर्धा तास खेळ. मी येतेच दोन-चार फेऱ्या मारून. त्यानं मानेनंच होकार दिला. वर बघितलेही नाही आणि स्वत:ला पुन्हा व्यस्त केलं त्या मोबाइलमध्ये. ती आली तशी क्षणात निघून गेली आपल्या मैत्रिणीसोबत. हे दृश्य पाहून मन विषन्न झालं. ‘अरे हे काय? या मम्मीला स्वतःच्या आरोग्याची बघा किती काळजी आणि मुलगा? त्याचं काय? दोन तासांपासून मोबाइलवर डोळे खिळवून तो बसलाय, त्याचे डोळे, मेंदू, शरीर कशाची तिला काळजी दिसली नाही.
लहान मुलं असलेल्या घरात सहज डोकावून पाहिलं तर थोड्या फार फरकानं हे असंच चित्र दिसतं. छोटी मुलं मोबाइलला चिकटलेली दिसतात. अगदी वेड्यासारखी. कधी या कोपऱ्यात बसून तर कधी त्या खुर्चीवर. कधी सोफ्यावर आडवी होऊन. तासन्‍तास. समोर टीव्ही सुरू असतो. आजूबाजूला आईवडील, नातेवाईक बोलत असतात. चर्चा रंगलेल्या असतात. आण‌ि ही मुलं मोबाइलमध्ये डोकं खुपसून गेम खेळत असतात. बरं, अनेक घरांमध्ये या अशा मोबाइल मेनिया झालेल्या मुलांचं कौतुकही होताना दिसतं. ‘आमचा सोन्या नं भारी हुश्शार! किती कळतं बाई त्याला मोबाईलमधलं. बघा बघा कशी पटापटा बोटं चालतात त्याची. आमच्या यांच्या मोबाइलमध्ये प्रॉब्लेम आला माझा सोन्या लगेच दुरुस्त करून देतो.’ वगैरे…वगैरे…कोवळ्या वयात; म्हणजे अगदी वयाच्या पहिल्या वर्षापासून मुलांच्या हाती मोबाइल देणारे पालकही अनेक आहेत. कधी बाळाचं रडणं थांबावं म्हणून तर, कधी चार घास अधिकचे त्याच्या पोटात जावे म्हणून मुलांकडे मोबाइल सोपवला जातो. मुलं मोबाइलमध्ये गुंतली की इतर कामे शांतपणे करता येतात. तसं पाहिलं तर पूर्वी हे काम टीव्ही करायचा. कार्टून नेटवर्क लावून दिलं की मुलं त्यात गुंतून राहायची आणि आई घरातली कामं पटापट आटोपून घ्यायची. मुलांची जेवणंही टीव्हीसमोरच व्हायची. पण आता या मोठ्या स्क्रीनची जागा सुटसुटीत अशा छोट्या मोबाइल स्क्रीननं घेतली आहे. हातात मावणारा मोबाइल घेऊन घरात कुठेही बसून शांतपणे, कोणत्याही अडथळ्याविना मुलं खेळू शकतात. पालकांनीच मुलांच्या हाती हे छोटं यंत्र दिलेले असल्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नाही. आणि मुलांच्या मनावर हे चांगलंच बिंबलेलं असतं. त्यामुळं आई कितीही ओरडली तरी ‘थांब ना आई, पाच मिनिटं. बसं थोडाच वेळ’ असं म्हणत ही मुलं आईला हुलकावणी देत असतात. आईही मुलगा कुठेतरी गुंतलेला आहे, आपल्याला फार काही त्रास देत नाही म्हणून त्याला मोबाइलशी खेळू देते.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्स, जीएसएम असोसिएशन आणि एनटीटी डोकोमो या मोबाइल सोसायटी रिसर्च इन्स्टिट्युटने १६ वर्षांखालील मुले आणि त्यांच्या मोबाइल मेनिया संदर्भात केलेल्या संशोधनाचा साधारण तीन वर्षांपूर्वी अहवाल आला होता. त्यावेळी अहवालात प्रकाशित झालेल्या आकडेवारीत आता दुपटीनं भर पडली आहे. त्या संशोधन अहवालात असं आढळून आलं की, भारतात ३५ टक्के मुलांजवळ त्यांच्या मालकीचा मोबाइल आहे तर ८३ टक्के मुलं आईवडिलांचे मोबाइल वापरतात. त्यापैकी १६ टक्के मुलांजवळ स्मार्टफोन आहेत. या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येईल की बहुतेक सर्वच मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय कुटुंबामधील मुलं मोबाइल फ्रेंडली आहेत. या मुलांमधली ४४ टक्के मुलं इंटरनेटचा वापर करतात, तर ७४ टक्के मुलं विविध प्रकारचे अॅप्स हाताळताना दिसतात. गेम्स आदी एण्टरटेन्मेंट अॅप्सच्या वापरासंबंधीची टक्केवारी तर धक्कादायक आहे. ९१ टक्के मुलं विविध प्रकारच्या एण्टरटेन्मेंट अॅप्सचा वापर करतात, असे या अहवालात म्हटले आहे. या अभ्यासात जपान, भारत, इंडोनेशिया, इजिप्त आणि चिली या पाच देशांतील मुलांच्या मोबाइल सवयी आणि याबाबत पालकांची जागरूकता याचाही अभ्यास करण्यात आला. त्यात असं आढळून आलं की, इतर देशांच्या तुलनेत भारतातील पालक मुलांना कोणत्या वयात मोबाइल द्यावा, मोबाइल खेळू नये म्हणून काय निर्बंध पाळले जावे, याबाबत फारसे जागरूक नाहीत. अशा पालकांची संख्या ५५ टक्के इतकी आहे. म्हणजे इतर पालकांनी मुलांना एकतर मोबाइल खेळण्यास मनाई केलेली दिसते किंवा आवश्यक तेवढाच मोबाइलचा वापर करण्याचा नियम लावून दिल्याचं म्हणता येईल. ‘मुलांनी मोबाइल वापरला तर काय हरकत आहे? आम्ही नोकरी करतो. त्यामुळे संपर्कात राहण्यासाठी मुलांजवळ फोन असणं अत्यंत आवश्यक आहे. मुलं सुरक्षित असली की आम्हीही शांत डोक्यानं आमची कामे करू शकतो’, अशी कारणे पालक देऊ शकतात; नव्हे देतात! पालकांचं हे म्हणणं जरी खरं असलं तरी मोबाइलच्या फायद्यांपेक्षा तोटेच अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. सोळा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या हाती मोबाइल देऊ नये, असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या वयात मुलांचा मेंदू नाजूक असतो. विकसित होत असतो. मोबाइलचे रेडिएशन्स या मेंदूच्या पेशींना दुखापत करून विकासामध्ये अडथळा आणतात. त्यामुळं अनेक आजार उद्भवू शकतात. मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे मुलांना कॅन्सर, ब्रेन ट्युमर, जेनेटिक नुकसान आदींचा धोका संभवतो. याशिवाय, मुलांच्या वागण्यातही बदल होतो. सतत एकट्यानंच मोबाइलशी खेळत राहिल्यानं ती एकलकोंडी होत जातात. चिडचिडी होतात. मोबाइलबद्दलच्या सततच्या विचारांमुळं त्यांचं अभ्यासावरचं लक्ष उडतं. सतत एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळं लठ्ठपणा वाढतो. मैदानावरचे खेळ बंद होतात. क्रिएटिव्हीटी कमी होते.

काही पालक तर मुलांना मोबाइल शाळेतही नेण्याची परवानगी देतात. जितका मॉडर्न, स्टायलिश मोबाइल तितकी त्यांची मुलं शाळेत मिरवताना खूष असतात. मग वर्गात मोबाइलशी खेळणं, मित्रांना मेसेजेस पाठवणं, कुणालाही फोन लावणं, अश्लील मॅसेजेस, फोटोंची देवाणघेवाण असेही प्रकार घडतात. तज्ज्ञांच्या मते, मोबाइलचं हे वेड मुलांच्या केवळ शारीरिकच नाही तर मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक क्षमतांचे नुकसान करू शकते. आपल्या मुलांना या मोबाइल मेनियापासून परावृत्त करायचं असेल, त्यांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर पालकांनी वेळीच मुलांच्या हातून मोबाइल काढून घेतला पाहिजे. मुलांना कोणत्या वयात मोबाइल द्यावा, किती वेळ वापरू द्यावा, कशा पद्धतीने वापरू द्यावा, याचे नियम पालकांनी स्वतःला आणि ‌अर्थातच मुलांनाही घालून दिले पाहिजे.

Share
  • Google Ads

Facebook Iconfacebook like buttonVisit Our BlogVisit Our BlogVisit Our Blog